सद्गुरु हे परमेश्वराचे सगुणरूप तर परमेश्वर हे सद्गुरूंचे निर्गुण रूप असतं,असं म्हटलं जातं.सद्गुरु आज्ञापालन तंतोतंत कसं करावं,याचा आदर्श म्हणजे आपले महाराज.सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे १९४४ साली मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला महाराजांनी दशग्रंथांची पारायणे करण्यास सुरुवात केली आणि मार्गशीर्ष शुद्ध दशमी म्हणजेच २५नोव्हेंबर १९४४ या दिवशी त्यांना पहाटे माडीवर जाण्याच्या जिन्यावर प्रभू श्रीरामचंद्रांचे सगुण दर्शन झाले. रामपाठात वर्णिल्याप्रमाणे,

शंख चक्र चापबाणl
वरदहस्त उदार नयन ll
विशाल भाल आकर्ण नयनll
ऐसा भगवान देखिला ll श्रीराम ll

अशा प्रकारचे ते रूप पाहून महाराज भान विसरून गेले.या दर्शनानंतर जवळपास तीन ते चार दिवस सतत त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू येत होते आणि मुखातून शब्द फुटत नव्हते.या सगुण दर्शनानंतर त्यांना परमपूज्य गोंदवलेकर महाराजांनी दासनवमी, गुरुपौर्णिमा आणि मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे उत्सव सुरू करण्याची आज्ञा केली.तसेच जे सश्रद्ध तुम्हास अनुग्रह देण्यास पात्र वाटतील, अशांना अनुग्रह देण्याची परवानगी दिली.मार्गशीर्ष शुद्ध दशमी हा पारमार्थिक जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची अनुज्ञा केली.

संत भेटी
महाराजांनी त्यांच्या समकालीन असलेल्या अनेक संत सत्पुरुषांच्या भेटी घेतल्या.त्यात प्रामुख्याने परमपूज्य परीट बाबा, परमपूज्य गुळवणी महाराज, परमपूज्य गोडबोले मातोश्री,परमपूज्य उपळेकर महाराज, स्वामी स्वरूपानंद,परमपूज्य नारायण महाराज केडगावकर,स्वामी नित्यानंद, परमपूज्य रंगावधूत महाराज यांचा समावेश आहे.

देवतांची दर्शने
१९४१साली महाराजांना श्रीपाद श्रीवल्लभ रूपात एक मुखी षडभुज अशा भगवान दत्तात्रेयांचे दर्शन राहत्या घरीच झाले.१९५५साली त्र्यंबकेश्वरला गेले असता,संत निवृत्तीनाथ यांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं. तसेच उत्तर भारताची यात्रा करताना मथुरेमध्ये पांडुरंग कुलकर्णी असे नाव सांगून साक्षात श्रीहरी नारायणाने पंढरपूरला येण्याचे आमंत्रण दिले आणि पंढरपूरला गेल्यावर पुन्हा तेच दर्शन दिले..