नमस्कार,

परमचैतन्य सद्गुरु श्री काणे महाराज यांच्यावर अंतःकरणापासून भक्ती करणाऱ्या सर्व सश्रद्ध भक्तांना माझा सप्रेम नमस्कार.

मी श्रीदेवी ओक( पूर्वाश्रमीची नंदिनी), अगदी लहानपणापासून महाराजांचे सानिध्य मला मिळाले. त्यातच महाराजांची नातसून झाल्याने मला महाराजांच्या संपर्कात असलेल्या अनेक शिष्यांचे महाराजांवरचे प्रेम, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये जवळून पाहण्यास मिळाली . आता काही शिष्य आपल्यामध्ये नाहीत. तरीही त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि त्यांच्यामुळे महाराजांशी जोडले गेलेले अनेक भक्त महाराजांवर तितकेच प्रेम करतात. अशा शिष्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा परिचय तरुण पिढीला व्हावा या हेतूने हे लिहीत आहे. आपणा सर्वांना एकत्र बांधून ठेवणारे महाराजाच आहेत. या भावनेने मला जाणवलेली काही शिष्यांची व्यक्ती चित्रे लिहिली आहेत. आपणा सर्वांना ती आवडतील,

अशी अपेक्षा



दादा नवरे

दादा नवरे

"श्री रामचंद्र कृपाळू भजमन,हरण भवभय दारुणं"

हे भजन कानावर पडताच आठवण येते ती,आपल्या दादा नवऱ्यांची ! तुलसी रामायण मनापासून वाचणारे दादा,काणे काकांचे मोठे भक्त होते.महाराजांच्या उत्सवात,आजारपणात व नंतर मंदिर बांधायच्या विचारापासून,ते पूर्ण होईपर्यंत,त्यांनी व त्यांच्या पत्नी सिंधूकाकू यांनी जी सेवा केली,त्याला तोड नाही.

लहानपणी आम्ही मोठ्या उत्सवाला जात असू.दहा पंधरा दिवस खूप मोठ्या प्रमाणात भक्त मंडळी येत असत.त्यावेळी वाढण्याची व्यवस्था दादा व अण्णा यांच्याकडे असायची. महाराजांची कडक शिस्त,वक्तशीरपणा यात,कसलाही गोंधळ न होता उत्तम वाढप करत,सोवळ्यात पंगती उठायच्या.त्याचे बरेचसे श्रेय या दोघांना जाते.उत्सवाला नवीन येणारे लोकं त्यांना,तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेता का?आमच्याकडे याल का?असं विचारत.आम्हाला हसू येई.कारण दादा म्हणजे डोंबिवलीतली बडी असामी होती.व्यवसाय,जमीन-जुमला आणि कर्तुत्ववान असलेले दादा,बेळगावला मात्र साधेपणाने सर्व करत.सर्वांच्यात मिसळून जात.महाराज आजारी असताना,त्यांची सेवा करण्यासाठी दादांचा मुक्काम बरेचदा बेळगावला असायचा.तेव्हा कपडे धुण्याचे काम दादांचं असायचं.ते मंडपात किंवा महाराजांजवळ दिसले नाहीत,की आम्ही म्हणायचो,असतील धोबी घाटावर....🙂

त्यावेळी माझी मुलगी पद्मा,लहान होती.बरीच मंडळी राहायला असायची.तेव्हा दादा मला वाढायला,पद्माला सांभाळायला,मदत करायचे.महाराजांच्या निर्याणानंतर देऊळ बांधायचे ठरले.हे काम पुरे होण्यासाठी जवळजवळ तीन-चार वर्षे लागली.त्यावेळी दादा व सिंधूकाकूंनी जी कामगिरी केली,त्याला तोड नाही.खूप माणसं राहण्यास असत.दर्शनाला,काम बघायला येत. त्यांची व्यवस्था करायला लागत असे. तसंच रोजची पादुकांची पूजा,आरती, नैवेद्य.त्या सर्वांची व्यवस्था सिंधूकाकू पाहत असत.सीजन प्रमाणे वेगवेगळ्या भाज्या,वाटीसाठी रुचीपूर्ण पदार्थ करत.साडेबारा वाजताचा नैवेद्य त्यांनी कधी चुकवला नाही.येणाऱ्या प्रत्येक माणसाचे हसून स्वागत करत व कोणीही प्रसाद न घेता जाणार नाही, याची काळजी घेत.माझ्या यजमानांवर म्हणजे सावकारांवर त्यांचे खूप प्रेम होते.त्यांना आवडणारे सर्व पदार्थ त्या करून घालत असत.रामाच्या मूर्ती आणल्या,तेव्हा दूध साखरेचा नैवेद्य, प्रतिष्ठापनेनंतर संपूर्ण जेवणाचा नैवेद्य, कसा वाढायचा,हे सेवा करण्यासाठी येणाऱ्या बायकांना,त्यांनी शिकवले.राममंदिरात सकाळी लवकर साफसफाई,आरती १२.३०चा नैवेद्य,चार वाजताचे वाचन,आरतीनंतरचे वाचन,तसंच रात्री करुणाष्टक,या सर्व पद्धती,दादानी बाकीच्यांना शिकवल्या.दादा व सिंधूकाकूंची चारही मुले,डोंबिवलीला राहतात.त्यांचा उद्योगधंदा व्यवस्थित सांभाळतात.मोठा मुलगा विंदा,आपला कार्याध्यक्ष आहे.उत्सवांमध्ये त्याची भेट होतेच.इतर मुले जमेल त्याप्रमाणे मंदिरात दर्शनाला येतात.आज दादा नाहीत,पण पुढे आपला मुलगा,नातू महाराजांच्या,रामाच्या सेवेत आहेत.मंदिरात गेल्यावर दादांची आठवण येते व न कळत अश्रूपूर्ण नेत्रांनी हात जोडले जातात.

बळवंतराव कुलकर्णी

बळवंतराव कुलकर्णी (अण्णा व अक्का कुलकर्णी)

महाराजांच्या समकालीन असलेले बळवंतराव,म्हणजेच अण्णा कुलकर्णी यांच्याबद्दल व त्यांच्या कुटुंबाबद्दल मला सुचलेले हे चार शब्द...

कृष्णाकाका कुलकर्णी लहानपणापासून महाराजांकडे येत असत.त्यांच्यामुळे अण्णा व अक्का आपल्या परिवारात सामील झाल्या. ठेंगणी,कोट-टोपी घातलेली त्यांची मूर्ती आजही डोळ्यासमोर उभी राहते. हसतमुख,शांत असे अण्णा, बेळगावात आले की कितीही उशीर झाला,तरी महाराजांकडे दर्शन घेऊनच जायचे.हा त्यांचा शिरस्ता होता.ते कडोलीला तलाठी होते.नंतर वडगावला राहायला आले.त्यांच्या पत्नी म्हणजेच अक्का,आपल्या मास्तरांच्या(सुरेश कुलकर्णी) मातोश्री.हसतमुख आम्हाला मदत करणाऱ्या आमच्या आक्का.माझ्या सासूबाईंकडून मदतीसाठी,कोणी अचानक आले की,सणासुदीला उत्सवाला तयारी करण्यासाठी,हमखास अक्कांना निरोप जाई.आक्का सर्व काही कामे,न सांगता आपणहून करत.त्यांच्या हातची पापुद्र्यांची पोळी अजूनही आठवते.

अण्णा व अक्का यांची तीन मुले म्हणजे,प्रेमाताई,मास्तर आणि नंदू.प्रेमाताई लग्न होऊन बेळगावातच स्थायिक झाल्या होत्या.कारणपरत्वे त्याही आमच्याकडे येत असत.दुसरे आपले मास्तर.मास्तरांच्या लग्नाची हकीकत मोठी मजेशीर आहे.मला आठवते कारण,तेव्हा मी उत्सवासाठी आले होते.त्यावर्षी दशमीच्या उत्सवात आपले गोविंदराव पुरोहित आणि वसुधा यांचे लग्न होते.लग्नाची करवली म्हणून बेबीताई आली होती.महाराजांनी मास्तरांच्या घरी निरोप पाठवला व त्या सर्वांना बोलवून घेतले.मास्तरांचे लग्न करूया,मुलगी दाखवतो,पहा पसंत आहे का?असे म्हणून बेबी ताईला दाखवले.दोन्ही कुटुंबे महाराजांचेच भक्त.त्यांनी पसंती दाखवून होकार दिला आणि झट मंगनी,पट शादी,असं म्हणत दोन्हीकडची तयारी आम्हीच करतो,असे महाराज म्हणाले.दशमीला लग्नाचा बार उडाला.मी गोविंदरावांची करवली झाले,म्हणून हे सर्व लक्षात आहे.

महाराजांनी लग्न करून दिलेली ही जोडी,आज पणजी पणजोबा झाली आहेत.त्यांची मुले राजू,सदानंद,स्मिता व संगीता,आपल्या परिवारात मोठ्या उत्तम तऱ्हेने जोडली गेली आहेत.सदानंद उत्सवाच्या तयारी पासून,सर्व आवरावरी करेपर्यंत आपली पत्नी स्नेहा व दोन्ही मुलांसह लक्ष घालतो.राजू जमेल तेव्हा कुटुंबासहित बेळगावला येतो.त्याच्या दोन्ही मुलींचा आपल्या यूट्यूब चैनल मध्ये मोलाचा वाटा आहे.स्मिताचे देशपांडे कुटुंबीय व संगीताचे जोशी कुटुंबीय आपल्या महाराजांचे अनुग्रहित आहेत.त्यांचा परिचय पुढे करून देईनच.

मास्तरांनी,महाराज आजारी असताना,त्यांची खूप सेवा केली.रात्री बऱ्याचदा मास्तरच त्यांच्याजवळ असत.सकाळच्या पहिल्या चहाला,काका मास्तरांना साद घालत.कधी कधी त्यांना रागवतही असत.मास्तरांचे धाकटे बंधू नंदू,अतिशय हसतमुख,महाराजांवर प्रचंड श्रद्धा असणारे,उत्सवात हिरीरीने भाग घेणारे होते.पण चांगली माणसे देवाला आवडतात.खूप लहान वयातच ते देवा घरी गेले.त्यांची पत्नी सुनिता लग्न होऊन आली आणि आपल्या परिवारात दुधात साखर विरघळते,तशी आपल्यातलीच झाली. हसतमुख,सर्व कामाला तयार,गाणं,भजन यात पारंगत. स्वयंपाकात तर तिचा हात कोणीच धरणार नाही अशी कुशल.पती निधनानंतर आपला जास्तीत जास्त वेळ रामाची,सद्गुरुंची सेवा करण्याचे व्रत तिने अंगीकारले आहे.आज मंदिरातील नैवेद्य,प्रसाद,भोजन व्यवस्था अतिशय उत्तमरीत्या सांभाळते.कोणीही केव्हाही येवो तो विन्मुख जाणार नाही,याची ती काळजी घेते.याहून मोठी श्रद्धा भक्ती ती काय असते? कै.अण्णा आणि आक्का यांनी सुसंस्कार करुन आपल्या मुलांनाही महाराजांचा अनुग्रह घेण्यास प्रवृत्त केलं.आज त्यांची मुले,सुना,नातवंडे तितक्याच श्रध्देने,भक्तीने उत्तम आयुष्य जगत आहेत.आपल्या शिष्याचा सद्गुरु कसा उध्दार करतात, याचं हे उदाहरण म्हणता येईल.

गोविंदा पुरोहित

गोविंदा पुरोहित

कालच माझी नात,मला शाळेत सांगितलेली,संत नामदेवांची लहानपणची गोष्ट सांगत होती.८-१०वर्षाच्या नामदेवाला विठ्ठलाला नैवेद्य दाखवायला आई पाठवते.देव जेवत नाही,म्हणून हट्ट धरून छोटा नामदेव तिथेच बसून राहतो.एवढ्या लहानपणी त्यांना देव दर्शन देतात.ही गोष्ट ऐकता ऐकता,मला आपल्या गोविंदा पुरोहितची आठवण झाली.संपूर्ण आयुष्यभर महाराजांची/रामाची सेवा त्यांनी केली.त्यालाही जन्ममरणाच्या फेऱ्यातून महाराजांनी सोडवले असेल,असे वाटले.

९-१०वर्षांचा असतानाच गोविंदा, आम्ही त्याला दादा म्हणतो,काणेकाकांकडे येऊ लागला. त्यांचा सहवास मार्गदर्शन घेत,त्यांच्या शिस्तीतच तो मोठा झाला.त्याच्या बरोबर आपसूकच त्याचे आई आणि वडील म्हणजे इंदू मावशी आणि आप्पा येऊ लागले.

अण्णा व अक्का यांची तीन मुले म्हणजे,प्रेमाताई,मास्तर आणि नंदू.प्रेमाताई लग्न होऊन बेळगावातच स्थायिक झाल्या होत्या.कारणपरत्वे त्याही आमच्याकडे येत असत.दुसरे आपले मास्तर.मास्तरांच्या लग्नाची हकीकत मोठी मजेशीर आहे.मला आठवते कारण,तेव्हा मी उत्सवासाठी आले होते.त्यावर्षी दशमीच्या उत्सवात आपले गोविंदराव पुरोहित आणि वसुधा यांचे लग्न होते.लग्नाची करवली म्हणून बेबीताई आली होती.महाराजांनी मास्तरांच्या घरी निरोप पाठवला व त्या सर्वांना बोलवून घेतले.मास्तरांचे लग्न करूया,मुलगी दाखवतो,पहा पसंत आहे का?असे म्हणून बेबी ताईला दाखवले.दोन्ही कुटुंबे महाराजांचेच भक्त.त्यांनी पसंती दाखवून होकार दिला आणि झट मंगनी,पट शादी,असं म्हणत दोन्हीकडची तयारी आम्हीच करतो,असे महाराज म्हणाले.दशमीला लग्नाचा बार उडाला.मी गोविंदरावांची करवली झाले,म्हणून हे सर्व लक्षात आहे.

काका ठाणे,डोंबिवली,मुंबई येथे आले, की आपला अभ्यास,नोकरी सांभाळून तो जास्तीत जास्त वेळ त्यांच्या सेवेसाठी येत असे. बेळगावच्या उत्सवात पेंडसे काका पूजा-अभिषेक,ब्राह्मणांची व्यवस्था करत असत.तेव्हा त्यांना तो मदत करीत असे,तर ओर्पेकाका प्रसाद,पंगत,आरती करीत.त्यांनाही दादा लागायचाच.अशा तऱ्हेने त्याला सर्व गोष्टींची माहिती होती.उत्सवात पंगतीच्या वेळी,वेगळी शिस्त असायची. कोणी कुठे बसायचे,कोणी वाढायला कोणत्या पंक्तीला जायचे, यावर त्याचे लक्ष असायचे.नवीन काम करू इच्छिणाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करायचा.वेळप्रसंगी कौतुक करायचा तर कधी रागवायचा.आम्हा सगळ्यांना त्याचा आदरयुक्त धाक होता.त्याचे लग्न बेळगावातच झाले. पुढे वसू वहिनी व तो,दोघांनी महाराजांची सेवा केली.अनेक उत्सवात आपल्याबरोबर नातेवाईकांस सामील करून घेतले.त्यांना अनुग्रह घ्यायला लावला.त्यांच्यावर कामाच्या जबाबदाऱ्या दिल्या.आपली मावशी,मेव्हणे,भाऊ,बहिणी या सर्वांना नाममार्गाला लावले.त्याची मोठी बहीण बेबीताई व मास्तर आपल्याला परिचित आहेत.दुसरी बहीण शोभा व तिचे पती शरद कावळे आणि धाकटी बहीण आशा व तिचे पती सुरेश व्यापारी यांची ओळख पुढे करून देईन.त्याचा भाऊ दत्ता पुरोहित हा देखील लहानपणापासूनमहाराजांकडे येत असे.त्याची पत्नी कविता व दोन्ही मुले आपली अनुग्रहित आहेत.दत्ताने अनेक उत्सवात दादाच्या बरोबरीने भाग घेतला आहे.आपण देवळात रोज वाचतो त्या 365 दिवसांच्या प्रवचनांचे संकलन,त्याने केले आहे काणे काकांवर कवनेही केली आहेत.

दादाची मावशी,शांतामावशी आम्हा सर्वांची मावशी आहे.त्या व त्यांचे पती यांनी महाराजांचा अनुग्रह घेतला व आपल्या चारही मुलांना घ्यायला लावला.ही सर्व मंडळी आपल्याला परिचित आहेत, कारण महाराज असताना व ते गेल्यानंतरही अनेक उत्सवात त्यांची उपस्थिती असते.मंदिराच्या कामात, जन्मशताब्दी उत्सवात,आत्ता साजऱ्या होणाऱ्या उत्सवात,नंदू,जयंत,प्रमोद सपत्नीक येतात.तसेच मोठ्या मुलाची पत्नी,श्रीमती वंदनाही येते.उत्सवात अनेक जबाबदाऱ्या पार पाडत असतात.

आजही बेळगावला उत्सव होतात पण पूर्वीची शिस्त आता राहिली नाही. काळानुरूप झालेले बदल स्विकारताना नेहमीच पूर्वीची उत्सवाची आठवण येते व त्याला धरून दादाची आठवण येते. दादा गेल्यावर मोठी पोकळी निर्माण झाली. वसू वहिनींना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागले.परंतु दृढ श्रद्धा असलेल्या वहिनींनी सारे निभावले.वहिनी आता 80 च्या घरात पोहोचल्या आहेत.पण अजूनही मंदिरात येतात.उत्सवात उत्साहाने भाग घेतात.त्यांची मुले,नातवंडे ही जमेल त्याप्रमाणे,बेळगावला येतात. अशा तऱ्हेने दादामुळे जोशी,व्यापारी,कावळे,कुलकर्णी अशी अनेक कुटुंबे आपल्या परिवारास जोडली गेली आहेत.त्याचा हा अल्प परिचय.

भागवत काका व काकू

भागवत काका व काकू

मंदिरात महिना-दीड महिना सेवेला येऊन राहणारा,सर्व कामे वेळेला महत्त्व देऊन करणारा,हसतमुख व गोड बोलणारा,आपला श्री म्हणजे श्रीकांत सरदेसाई,सर्वांच्या परिचयाचा आहे.हे सेवेचे व्रत त्याने आपले आजोबा बंडोपंत भागवत व वडील द.मु.काका सरदेसाई यांचेकडून घेतले आहे.

डोंबिवलीला राहणारे बंडोपंत भागवत महाराजांचे जुने अनुग्रहित. सडसडीत उंच बांधा,चष्मा लावणारे भागवत काका,रेल्वेमध्ये कामाला होते.महाराजांकडे होणाऱ्या दहा दिवसाच्या उत्सवाला दरवर्षी ते येत असत.नाममंडप फुलांच्या माळांनी सजवण्यापासून,वाढपापर्यंतच्या सर्व कामात ते मदत करत.

महाराज गणपतीच्या सुमाराला पुणे-मुंबई येथे येत असत.डोंबिवलीत खूप अनुग्रहित मंडळी राहत होती.त्यांचे एकमेकांशी चांगले सख्य होते.आरतीला,पूजेला,काकांच्या दर्शनाला,वेळ मिळताच लोक येत असत.आम्ही लहान मुले ही सवडीनुसार आई-वडिलांबरोबर दादर,ठाणे,डोंबिवली येथे जात असू.छोट्या उत्सवाचे स्वरूप असायचे.

बंडोपंतांच्या पत्नी सुशीलाकाकू खूप शांत,हसतमुख,व गोऱ्यापान.त्याही उत्सवांना येत असत.त्यांचे कडे उत्सवातील दहीताक याची व्यवस्था असायची.मोठ्या डेऱ्यात लोणी येईपर्यंत,त्या ताक घुसळण्याचे काम करीत.

त्यावेळी मी लहान होते.मला नऊवारी साडी नेसावी लागे.सोवळ्यात पंगत वाढायची असे.मला खूप राग येत असे,तेव्हा माझी समजूत काढून नीट सोवळे नेसून द्यायची जबाबदारी,त्या घेत.चार गोष्टी समजावून सांगत.त्यांच्यासारखा हसरा चेहरा करूनच बाहेर पाठवत.आजही खोलीतल्या जिन्याजवळ गेले की त्यांची आठवण येते.

काका काकूंची चारही मुले महाराजांकडे येत असत.मोठा रघुदादा सपत्नीक उत्सवाला येत असे.धाकटा अनंता अजूनही मंदिरात येतो.त्यांची मोठी मुलगी सिंधूताई व तिचे पती आपले द.मु.काका सर्वांच्याच परिचयाचे आहेत.ते उत्सवाला तर येतच.पण पुढे राम मंदिर झाल्यावर महिना-दोन महिने सवड काढून सेवेसाठी येत असत.आजची मंदिराची दिनचर्या पाहता,तेव्हा येणाऱ्या दादा नवरे,अंबिके काका,बाळ काका,द.मु.काका,वासूकाका यांनी इतके वर्ष शिस्तीने सांभाळलेल्या पद्धतींचे श्रेय त्यांना द्यावेसे वाटते.द.मु.काकांनी रचलेली महाराजांची आरती आपण रोज म्हणतो.बऱ्याच भक्तांना या गोष्टी माहीत नसतील,म्हणून उल्लेख करत आहे.

द.मु.काकांची पत्नी सिंधुताई सुध्धा आपल्या आईसारखी हसतमुख,उत्सवात वाढण्यापासून आवरण्यापर्यंत मदत करणारी आहे.अजूनही वर्षातून एकदा तरी बेळगावला दर्शनाला येते.

काकांची धाकटी मुलगी,पुष्पा व तिचे पती शरद हर्डीकर.हेही आपले अनुग्रहित आहेत.हर्डीकर,महाराज आजारी असताना सेवेसाठी येत असत.हसतमुख व उमदे व्यक्तिमत्व असलेले हर्डीकर काका,फार लहान वयात देवा घरी गेले.

भागवत काकांचा नातू,आपला श्रीकांत,महाराजांचा मोठ्ठा भक्त आहे. कसलीही अपेक्षा न करता श्रद्धेने,प्रेमाने गरज पडताच,मंदिरात सेवेला हजर होतो.वेळ पडल्यास आम्हाला किचनमध्ये मदत करतो. भाजीपाला,सामान आणून देतो.सोवळे नेसून आरती,नैवेद्याचे ताटही हाती धरतो.अशी ही भागवत काकांची तिसरी पिढी.खरंच महाराजांनी एकदा आपलं म्हटलं की सारे कुटुंब त्यांचं होतं,व ते सर्व जबाबदारी घेतात.

शोभा व शरद कावळे

शोभा व शरद कावळे

पूर्वी दसरा दिवाळी हे सण जवळ आले,की घरांची रंगरंगोटी साफसफाई सुरू होत असे.घरं मातीची,विटांची असत.त्यामुळे एक हात रंगाचा मारला, की सारे घर चमकू लागे.आपल्याकडेही मार्गशीर्षातला मोठा उत्सव,हा दिवाळीपेक्षाही मोठ्या थाटात साजरा होत असे.रंगकाम,साफसफाई करणारी आपली भक्त मंडळी ठरलेली होती. इलेक्ट्रिकचं काम भावेकाका व त्रिंबकराव,तर रंगाचं काम कावळे काका करीत.उंच पुरे,हसतमुख कावळेकाका सर्व कामात माहीर होते. मूळचे सोलापूरचे असलेल्या काकांना, माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये नोकरी मिळाली व ते मुंबईकर झाले.पुढे कावळेकाकांचं आपल्या गोविंदा पुरोहित यांच्या बहिणीशी म्हणजे शोभाशी लग्न झाले व ते आपल्या परिवारात सामावून गेले.महाराज गमतीने म्हणत,कावळे म्हणजे का वळे येथे?त्यांच्या घराण्यात कोणतीही गुरुपरंपरा नसताना ते काणे महाराजांच्या परिवाराला जोडले गेले.महाराज म्हणत कारण ते आमचेच आहेत.पुढे महाराजांनी त्या उभयतांना अनुग्रह दिला व आपलेसे करून घेतले ते कायमचेच!बेळगावला होणाऱ्या बऱ्याच उत्सवांना ते येत असत.पाककलेची त्यांची आवड पाहून त्यांना पाक शाळेचे प्रमुख बनवले.कोणत्याही समारंभात,उत्सवात महाराजांना आवडणारे पदार्थ लक्षात ठेवून तसा मेनू बनवून ते करीत असत.कोणताही पदार्थ फुकट जाणार नाही,याची काळजी घेत.काही उरलेसुरले तर त्याचाच उपयोग करून खमंग लज्जतदार पदार्थ तयार करणे,ही त्यांची हातोटी होती.तसं ते आचाऱ्याकडून करून घेत.शोभाही त्यांचे बरोबरीने भाग घेत असे.महाराज आजारी असताना,तसंच पुढे राम मंदिर झाल्यावर,तिथल्या देखभालीसाठी ते एक दोन महिने येऊन सेवा करीत. साफसफाई,झाड लोट,करताना त्यांचे नामस्मरणही चालू असे.त्यांची मुले कला व विजय आपल्या आई-वडिलांप्रमाणे उत्सवाला येतात. कलाचे यजमान म्हणजे आपले जावई संदीप खेर हे देखील उत्सवात हौशीने भाग घेतात.विजय आपल्या कमिटी मध्ये कार्यरत आहे.यावरून असेच म्हणावेसे वाटते,की एकदा महाराजांनी आपले म्हंटले,की आपण त्यांचे होऊन जातो.

गोविंदा पुरोहित यांची धाकटी बहीण म्हणजे आपली आशा व्यापारी.ही अगदी लहान असल्यापासून आपल्या आई-बाबांबरोबर किंवा दादा बरोबर महाराजांकडे दर्शनाला,तर कधी उत्सवाला येत असे.पुढे तिचे लग्न सुरेश व्यापारी यांच्याशी झाले.तेही या परमार्थ मार्गातले होते.परमपूज्य कुर्तकोटी महाराज म्हणजेच महाभागवत यांचा अनुग्रह त्यांना मिळाला होता.नंतर आशा महाराजांकडे गुरुपौर्णिमेला दर्शनासाठी आली असताना महाराजांनी तिला अनुग्रह दिला.पण तेव्हा एक गमतीदार प्रश्नही विचारला की,तुला अनुग्रह कशाला हवा आहे?श्रीमंत होण्यासाठी की मुलगा व्हावा म्हणून?आणि सांगितले की,नामस्मरण कर.तेच आपल्याला तारुन नेते.नुसत्या अनुग्रहाचा काही उपयोग नसतो.आशा बरोबर सुरेश व्यापारी आपल्या परिवारात सामावून गेले.ते उत्तम चित्रकार होते.महाराजांना निवृत्तीनाथांचे दर्शन झाले होते.त्याचे वर्णन त्यांनी व्यापारी काकांना सांगितले.व्यापारी काकांनी वर्णनाप्रमाणे,निवृत्तीनाथांची चार चित्रे महाराजांना काढून दिली.पुढे १९८५ मध्ये व्यापाऱ्यांना महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिले.व त्यांनी महाराजांचे सुंदर चित्र काढले.अशा या मृदू स्वभावाच्या, धार्मिक वृत्तीच्या,चित्रकाराचे १९१३ मध्ये निधन झाले.त्यांच्या तिन्ही मुली खूप हुशार, कर्तृत्ववान आहेतच,पण आपल्या अनुग्रहितही आहेत.प्रिया, प्रज्ञा,प्राजक्ता यांच्या पतीनींही अनुग्रह घेतला आहे.ते सर्व जमेल त्याप्रमाणे उत्सवाला,दर्शनाला येतात.आशाच्या महाराजांवरील प्रचंड श्रद्धेने,ती कायम हसरी,आनंदी असते व कायम गुरूंचे सानिध्य अनुभवते.

दत्तूअण्णा जोशी व गोदुमावशी

दत्तूअण्णा जोशी व गोदुमावशी

बेळगावला येणाऱ्या बऱ्याच लोकांनी जवळ असलेल्या पंत बाळेकुंद्रीला आवर्जून भेट दिली असणार.ऊसाचे मळे व दाट अमराईने नटलेल्या पंतमहाराजांच्या समाधी मंदिरात एक वेगळे समाधान मिळते.या मंदिराची पूजा अर्चा,नैवेद्य याची व्यवस्था बघणारे आपले दत्तूअण्णा जोशी व गोदुमावशी काणे महाराजांच्या शिष्या होत्या.

लहानपणी मोठ्या उत्सवासाठी बरीच भक्त मंडळी मुला बाळांसकट दहा-पंधरा दिवस बेळगावला येत असत.तेव्हा शाळेच्या सुट्टीची फारशी कटकट नसे.आम्हां सगळ्यांना एकदा तरी बाळेकुंद्रीला जायला आवडायचे.आजूबाजूला गुऱ्हाळे लागलेली असायची काकवी,गुळाचा खमंग वास घेत,ऊसाचा रस प्यायचा म्हणून,आम्ही दत्तूअण्णा व गोदुमावशीकडे जात असू.गोऱ्या हसतमुख मावशी आमचे सर्वांचे प्रेमाने स्वागत करून मंदिर,धुनी,मोठमोठ्या काहिली,एकतारीवरचे अखंड नामस्मरण सारं काही फिरून दाखवत व लावलेल्या पोह्यांचे ताट व कासंडीतून रस समोर आणून ठेवत.त्यांचे बोलणे एवढे गोड असायचे की निवांतपणे तेथेच राहावे,असे वाटायचे.

दत्तूअण्णा व मावशीकडे मंदिराच्या व्यवस्थापनामुळे खूप वर्दळ असायची. पूजाअर्चा एकतारीवरचे भजन या सर्व गोष्टी व्यवस्थित करण्याकडे त्यांचा कटाक्ष असे.मावशीना रोज पुरणावरणाचा स्वयंपाक नैवेद्यासाठी करावा लागे.तेथे येणाऱ्या भक्तांच्या आदरातिथ्यात कधीही उणीव पडली नाही.मावशींनी काणेमहाराजांचा अनुग्रह घेतला होता.अनेक वेळा त्या दर्शनासाठी वेळात वेळ काढून येत असत.आपला मार्गशीर्ष दशमीचा उत्सव व बाळेकुंद्रीचा तीन दिवसाचा उत्सव,एकाच वेळी असे.हजारो माणसं बाळेकुंद्रीला प्रसादासाठी असत.त्या दिवशी सर्व काम आटोपून,संध्याकाळी त्या आपल्याकडे प्रसादासाठी येत असत.कारण दशमी हा आपल्या उत्सवाचा महत्त्वाचा व मोठा दिवस असे.

आपल्या सर्वांप्रमाणेच काणे महाराजांनाही बाळेकुंद्री आवडत असे. दसऱ्याच्या दिवशी महाराज सिमोल्लंघनासाठी बाळेकुंद्रीला जात असत.आजही दसऱ्याच्या दिवशी आपली पालखी सेवा तेथे असते.

मावशींच्या कुमारचे लग्न महाराजांच्या संमतीनेच झाले.हेमाला प्रथम महाराजांकडे नेऊन,त्यांनी होकार दिल्यावर,लग्न ठरले.कुमार सहित हेमाही आपल्या परिवारात सामील झाली.कुमार बाळेकुंद्रीहून बेळगावला नोकरीनिमित्त रोज येत असे.तेव्हा न चुकता महाराजांकडे दर्शन घेऊनच जात असे.अतिशय साधी राहणी असणारा कुमार,खूप बुद्धिमान,इंग्रजी मराठी भाषेवर प्रभुत्व असणारा आहे.त्याने पंत महाराजांचे ओवीबद्ध संक्षिप्त चरित्र लिहिले आहे.आपल्या वेबसाईटवरील सुखसंवाद माला,या २१ पुष्पांचा सारांश त्यानेच लिहिला आहे.बेळगावला असणारी त्याची मुलगी,प्रज्ञा आपल्याकडे उत्सवात,मंदिरात गरज पडेल तेव्हा सेवेला येत असते.ही मंडळी पंत बाळेकुंद्री महाराज व काणे महाराज या दोघांचेही भक्त आहेत.दोन्ही संत हे एकच आहेत,हे गुरुतत्व त्यांनी जाणले,अनुभवले आहे,याची प्रचिती या कुटुंबाला बघून येते.

दिवाकर दांडेकर

दिवाकर दांडेकर

काल प्रवचनाचा व्हिडिओ करताना,कृष्ण सुदाम्याची भेट हा विषय आला आणि मला ठाण्याला झालेल्या भागवत कथेची आठवण झाली.त्यात गोपाळकाला प्रसंगाचे वेळी,आपले गुरुबंधू दांडेकर काकांनी,सुदाम्याची भूमिका केली होती.डोळ्यासमोर ३५/४०वर्षांपूर्वीच्या अनेक प्रसंगाच्या आठवणी तरळून गेल्या.

दांडेकर काका रेल्वेमध्ये नोकरी करत असत.आपले पेंडसे काका ही त्याच ऑफिसमध्ये होते.त्यांच्याकडून काणेमहाराजांच्या अनेक गोष्टी दांडेकर काकांनी ऐकल्या व त्यांना काणे महाराजांकडे जावे,दर्शन घ्यावे असे वाटू लागले.तो योग लवकरच जुळून आला.अंबरनाथला टिकेकर यांच्याकडे महाराज आले असताना,दांडेकरांना दर्शनाचा योग आला.

पुढे १९७० मध्ये मार्गशीर्ष दशमीला, त्या उभयतांना महाराजांनी अनुग्रह दिला.प्रत्येक वर्षी ते दोघे मुलांना घेऊन,उत्सवाला येऊ लागले.स्वयंपाकात सुगरण असणाऱ्या काकू,पाकशाळेत मोठ्या उत्साहाने भाग घेत असत.एक वर्षी मोठ्या उत्सवात काकूंच्या देखरेखी खाली १० लाल भोपळ्याचे घारगे बनवले होते. अजूनही त्याची चव तोंडावर आहे.काकू आंबोशीचे लोणचे,आंब्याच्या वड्या,साठे असे पदार्थ छान बनवत.महाराज आजारी असताना तोंडाला चव आणणाऱ्या आंबोशीच्या लोणच्यावर ते खुश असायचे. बोलक्या ,प्रेमळ,सश्रद्ध काकूंचे २००६ सालि निधन झाले.९३ वर्षाच्या काकांची प्रकृती उत्तम असून ते त्यांच्या धाकट्या मुलाकडे,मनोहरकडे राहतात.

स्वतः विषयी सांगताना मनोहर म्हणतो,"मेरा जीवन कोरा कागज, कोरा “ना " रह गया", कारण लहान वयातच त्याला महाराजांचा सहवास मिळाला व त्यांचाच कृपांकित झाला. लहान असताना तो उत्सवाला येत असे.नियमित संध्या व गायत्री जप करणारा मनोहर व त्याची पत्नी जयंती आपलेच अनुग्रहित आहेत. कधी उत्सवाला तर कधी पत्नी मुलांना सासुरवाडी शिरसीला जाताना सर्वांना घेऊन दर्शनाला येतो.लहानपणी पाहिलेल्या उत्सवांच्या आठवणी ते भरभरून सांगतात.सिंधुताई माझ्या सासूबाई व महाराज यांनी केलेले कौतुक,अजूनही ते विसरले नाहीत.अमेरिकेला स्थायिक झालेली त्यांची लेक योगिनी व जावई रोहित आगाशे,भारतात आल्यावर बेळगावला येतात.आपल्या आजोबा, बाबांच्या सारखाच भाविक असलेला सुजय,हा त्यांचा मुलगा आपल्या युट्यूबच्या कामात मदत करतो. समाधानी कुटुंबाचे सारे श्रेय महाराजांना देताना,मनोहर आपल्याला जीवनात खूप खूप मिळालं,या शब्दात कृतज्ञता व्यक्त करतो.